ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - राष्ट्रवादी काँग्रेस हा तडजोड करणारा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व नाममात्र असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यावर आरोप करीत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, माझ्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य आरोप करणाऱ्यांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी ते जळगावात आले असता, ‘मुक्ताई’ या त्यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर व भाजपावर टीका केली. सध्या जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व हे नाममात्र आहे. आपल्या मुक्ताईनगर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिवसेनेला मदत केली.
या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पाच हजारांच्या आत मते पडली. अपेक्षित मते न पडल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी यावी तसेच कार्यकर्त्यांना चेतना मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.भुसावळची जमिन साखर कारखान्यासाठीजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जमिनीवरून सध्या सुरु असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की, सध्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात इथेनॉल प्रकल्प सुरु करण्याबाबत त्यावेळी सूचना केली होती. त्यानुसार जामनेर तालुक्यालगत जमीन घेण्यात आली. त्यावेळी प्रत्येकाने ही जमिन वैयक्तिक खरेदी करून नंतर ती कारखान्याला वर्ग करावी असा निर्णय झाला होता. त्यानंतर केंद्रात सत्ता बदल झाली. कालांतराने केंद्रशासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबतच्या धोरणात बदल केला. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.आजही ही जमीन नापिक आहे. या प्रकरणात गिरीश महाजन यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. १०० कोटींचा दावा दाखल करणारपुरावे न देता माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या अंजली दमानिया, प्रीती मेनन यांच्यावर १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.अब्रुनुकसानीचा दावा महिन्याभरात बोर्डावरआमदार गुलाबराव पाटील यांना म्हसावद येथील प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा खटला या महिनाभरात बोर्डावर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या रिलॅक्स आहेराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, दोन टप्प्यात हे काम होणार असून संपूर्ण काम शासन करणार आहे. त्यानुसार काही दिवसात कार्यारंभ आदेश शासनाकडून होण्याची शक्यता आहे. सध्या आपण रिलॅक्स आहोत. निवांतपणाचा अनुभव घेत आहे. पुढे आयुष्यभर कामे करायचीच असल्याचे खडसे यांनी सांगितले.