Eknath Khadse News: मी संभ्रमावस्थेत आहे. मी आधीच सांगितले आहे. भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपाला माझी आवश्यकता नाही, असे वाटत आहे. मी काही अडचणींमुळे भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी अजून आहेत. तसे आश्वासन मला भाजपाकडून देण्यात आले होते, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना भाजपामध्ये माझा प्रवेश झाला असला तरी तो जाहीर करण्यात आलेला नाही. यामागे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असल्याचा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यामुळे राजकारणात पुन्हा एका खळबळ उडाल्याचे चित्र आहे. गेली पाच ते सहा महिने भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हस्ते माझा प्रवेश झालेला आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन विरोध करत असतील तर मला असे वाटते की, नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस पक्षामध्ये मोठे असावेत, असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
माझा मूळ पक्ष काय वाईट आहे?
भाजपाला माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार आहे. भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईन. जाईन म्हणजे मी राष्ट्रवादीचा सदस्य आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभ राहणार अशी चर्चा आहे. आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत,मात्र अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते. कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिकाऱ्याचे काम होते, असे खडसे म्हणाले.