- मोसीन शेख
मुंबई: दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ मुंडे समर्थकांच्या मेळाव्यात माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार व त्यांची भूमिका काय असणार, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे ह्या भाजपवर टीका करतील किंवा पक्ष सोडण्याचे निर्णय घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी ज्याप्रमाणे भाजप वर टीका केली, त्यांनतर पंकजांपेक्षा खडसेंचीच अधिक चर्चा पाहायला मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर त्या भाजप सोडणार इथपर्यंत चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तसेच मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याची भूमिका पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरील केलेल्या भाषणातून स्पष्ट केली. मात्र याचवेळी त्यांच्याधी झालेल्या भाषणातून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला.
आपल्या भाषणात बोलताना खडसे म्हणाले की, मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.
गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तोच संघर्ष आज माझ्या वाट्याला आला आहे. मी तसाच संघर्ष आज अनुभवतो आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. आधी छळायचं, मारायचं, दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की गोपीनाथजी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाले असते, असा टोला सुद्धा खडसेंनी यावेळी भाजपला लगावला. त्यामुळे गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतनाच खरा माहोल खडसेंनी तयार केल्याची चर्चा उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली.