मुंबईः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपामध्ये नाराज असलेले खडसे लवकरच महाआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे काल एकनाथ खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊतांनीही खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात असतात, असं विधान केल्यानं खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे देवेंद्र सरकार-2 कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल पक्षाला घरचा आहेर दिला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं. तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं. भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी चर्चा तेव्हा रंगली होती. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं, तसेच त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरमधून तिकीट दिल्यानंतरही राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटलांनी तिचा पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं विचारल्यानंतर त्यांनीही ते वृत्त फेटाळून लावलं होतं. पक्षाच्या आदेशानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेले 30 वर्षे तुम्ही मला निवडून देताय. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी सोबत तीन महिनेच काय तर तीन वर्षांपासून संपर्कात राहिलेलो नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे त्यावेळी दिलं होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत की शिवसेनेत कोणत्या पक्षात जाणार?, या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:47 AM