मुंबई : अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्याविरुद्ध विनयभंगाची खोटी केस केली, असा आरोप करणाऱ्या खडसेंनी आपल्याला खूप छळले, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला. दमानियांनी केलेल्या तक्रारीतून मी अलिकडेच सुटलो हे खडसे यांचे विधान धादांत खोटे असून माझ्या तक्रारीच्या प्रकरणातून ते अजिबात सुटलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या.
खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुक्ताईनगरच्या पोलिसांनी आपला त्या संदर्भात दोनवेळा जबाब घेतला. न्यायालयातदेखील आपण बाजू मांडली. ३२ ठिकाणी माझ्याविरुद्ध अवमानना खटले दाखल केले. माझ्याविरुद्ध ते वाट्टेल तसे बोलत असतात. फडणवीस यांच्या सांगण्यावरुन मी तक्रार का द्यावी? खडसे आणि फडणवीसांचे काय राजकारण आहे ते त्यांना लखलाभ पण एक स्री म्हणून जाहीर सभेत माझ्याविरुद्ध काहीही बोलले जात असेल तर मी चूप का राहायचे, असा सवाल दमानिया यांनी केला.
मी आतापर्यंत नितीन गडकरी, अजित पवार, छगन भुजबळ अशा नेत्यांविरुद्ध लढा दिला, तसाच तो खडसेंविरुद्धही देत आहे. सर्व ताळतंत्र सोडून एका महिला सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध खडसे वाट्टेल ते बोलले होते, त्यांना धडा शिकवणारच हा निर्धार मी सुरुवातीपासूनच केला होता, असे दमानिया म्हणाल्या.