मुंबई : गेली पाच वर्ष सुरु असलेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील वाद काही नवीन नाही. त्यामुळे खडसे हे भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता हा वाद मिटला असल्याचे दावा भाजप नेत्यांकडून अनेकदा करण्यात आला आहे. त्यातच आता खडसे यांनी फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांचे अधिवेशनात मांडत असलेल्या भुमिकेवरून कौतुक केले आहे.
खडसे म्हणाले की, गेली चार दिवसांपासून विधानसभेचं सत्र सुरु आहे. तर या चार दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडत आहे. विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत असल्याचे आजचं चित्र आहे. त्यामुळे अधिवेशनात मी असो किंवा नसो आमचे नेते विरोधी पक्षाची भूमिका योग्य रितेने पार पाडत असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा आणि विधानपरिषदेत भाजपकडून शेतकरी कर्जमाफी, नुकसानभरपाई आणि महिला अत्याचाराच्या मुद्यावरून सरकाराला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तर फडणवीस यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षाकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी करत फडणवीस आणि दरेकर जोरदारपणे पक्षाची भूमिका मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे.