मुक्ताईनगर (जि. जळगाव) : आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ज्या पक्षासाठी आजवर आपण कष्ट केले तिथेच आपल्याविरुद्ध कटकारस्थान होणार असेल तर ते कुठवर सहन करणार, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाउसवर तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे पक्ष अथवा दिल्लीतील नेतृत्वाविरुद्ध माझी तक्रार नाही.
अंजली दमानिया यांनी माझ्याविरुद्ध विनयभंगाचा खोटा खटला कोर्टात दाखल केला. पोलीस तयार नसताना फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात आपण फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता ती महिला गोंधळ करत होती म्हणून नाइलाजाने मला आदेश द्यावे लागले, असे उत्तर मला मिळाले. सुदैवाने पंधरा दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालो आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण चार वर्षे वाट पाहिली. पण सतत अन्याय करण्यात आला. पीएने लाच मागितल्याच्या कथितप्रकरणात माझ्यावर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली, असेही खडसे यांनी सांगितले.
फडणवीसांनी पक्ष सोडण्यास मला भाग पाडले -माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोपही खडसे यांनी केला.
मला व्हिलन ठरवलं जातंय : फडणवीसऔरंगाबाद : एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावे लागते. त्यानुसार मला व्हिलन ठरवत आहेत. माझ्याबाबत काही समस्या होती तर त्यांनी तशी तक्रार वरिष्ठांकडे करायला हवी होती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या पक्षांतरावर औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्यामुळे पक्षाचे कितपत नुकसान होईल, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, काहीना काही नुकसान होत असतं; परंतु भाजप हा मोठा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने थांबत नाही किंवा येण्याने इकडेतिकडे होत नाही.
पक्ष सोडतील असे वाटले नव्हतेएकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत नव्हते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप