मुंबई - राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचं तिसरं नाव जाहीर करण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी काल शनिवारी भाजपने दिलेला राज्यसभेतील खासदारकीचा प्रस्ताव मान्य केला. त्याआधी प्रकाश जावडेकरांचे नाव जाहिर करण्यात आलं होतं. आज महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तिसऱ्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिघेही उद्या सोमवारी ते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
राज्यसभेसाठी आज भाजपानं देशभरातील 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. पण राणे, जावडेकर आणि व्ही मुरलीधरन यांच्या नावाची घोषणा करत सर्वच चर्चेंना पुर्णविराम मिळाला आहे.
शनिवारी भाजपाकडून एकनाथ खडसे यांचे अनपेक्षित नाव पुढे आले होते. खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी समर्थकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. खुद्द खडसे यांनीही जाहीर व्यासपीठांवर आपल्या मनातील खदखद बोलून फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती होती. मात्र खडसे त्यासाठी अनुत्सूक होते. अखेर आज भाजपाने यादी जाहिर केल्यामुळं एकनाथ खडसेंची दिल्लीवारी टळली आहे.16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.