शीलेश शर्मा, नवी दिल्लीआपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी तो न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंगळवारी दिल्लीत केली. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, न खाने दंूगा, असे जाहीर केले होते, पण त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी केली. खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आले असूनही पंतप्रधान त्याबद्दल गप्प का आहेत, त्यांना खडसे यांचा भ्रष्टाचार दिसत कसा नाही, असा सवालही त्यांनी केला. खडसे यांच्या मोबाइलवर अंडरवलर्ड डॉनच्या घरून फोन येतो आणि तरीही पंतप्रधानांना त्याचे काही वाटत नाही, अशी टीका करून सुश्मिता देव म्हणाल्या की, ‘खडसे यांच्या साऱ्या कहाण्याच भ्रष्टाचाराच्या असल्याचे आता पुढे येत आहे. विरोधी पक्षांनी न केलेला भ्रष्टाचारही पंतप्रधानांना दिसतो, पण खडसे यांचे नाव पुढे येताच मात्र ते आता भाजपाचे सारे नेते गप्प बसतात, हे आश्चर्यच आहे.’ज्या मोबाइलवर दाऊदच्या घरून फोन आले, तो क्रमांक आपला असल्याचे स्वत: एकनाथ खडसे यांनी मान्य केले आहे, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, ‘जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून दूर केले जात नाही, तोवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अशक्य आहे. त्यामुळे खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.’ >भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पंतप्रधान त्याकडे डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून सुश्मिता देव या म्हणाल्या की, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंंधराराजे या ललित मोदी यांना पाठिशी घालतात आणि तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याची कारणे जनतेला माहीत आहे.एवढेच नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह सरकारचा यांचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घोटाळा, त्यांच्या मुलाचे परदेशातील काळ्या पैशाचे प्रकरण, अनेक बळी घेणारा मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान सरकारचा व्यापम घोटाळा अशी प्रकरणे समोर आली असतानाही त्याची चौकशी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. याचाच अर्थ, ते भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज यांना पाठिशी घालत आहेत.