ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०४ - अनेक गंभीर आरोपांच्या गर्तेत अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंचा राजीनामा स्विकारला आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. 'लोकमत'ने याप्रकरणी सर्वात पहिल्यांदा त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिले होते. खडसेंचा राजीनामा स्विकारुन राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. खडसेंनी आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशीसाठी नियुक्त केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिलं आहे.
काल मध्यरात्री भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मुंबई झाली. दिल्लीहून मोठय़ा प्रमाणावर दबाव आणला गेल्याने खडसेंनी राजीनामा देऊन सरकारमधून बाजूला व्हावे, आणि निपक्ष चौकशी होऊ द्यावी असा सूर त्या बैठकीत उमटल्यानंतर त्यांना आज मुख्यमंत्र्यातर्फे राजीनामा देण्यास सांगण्यात येणार होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच खडसे आज सकाळी एकटेच झाकलेल्या दिव्याच्या गाडीतून वर्षा येथे पोहोचले व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राजीनामा सुपूर्त केला.
Received the resignation from Shri @EknathKhadseBJP ji.
I've accepted it and sent it to Hon'ble Governor.
(1/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 4, 2016
.@EknathKhadse ji has demanded an inquiry into allegations against him.A retired HighCourt Judge will be appointed to conduct inquiry.
(2/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 4, 2016
खडसेंनी पुण्यातल्या भोसरीच्या जागेची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयाच्या नावाने केलेली खरेदी त्यांना भोवली असून मंत्रीपदावर असताना स्वत:च्या खात्याअंतर्गत येणारा विषय त्यांनी स्वहितासाठी वापरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्यानेच हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेली असताना त्याचे सेलिब्रेशन एकीकडे साजरे होत होते तर दुसरीकडे खडसे यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाची देशभर बदनामी चालू होती. पक्ष एवढा बदनाम कधीच झाला नाही, शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने खडसे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे व फोटो टाकून मुंबईभर पोस्टर लावल्याबद्दल श्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
काल रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याआधी दुपारी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींची याच विषयावर चर्चा झाली. फार दिवस हा विषय चालू ठेवणे पक्षासाठी घातक असल्याचे मत सगळ्यावेळी मांडले गेले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय काही दिवस आधीच झाला होता, पण विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध पार पडू द्या असा सूर पक्षात होता. संघाने खडसेंविषयी फार चांगले मत दिले नव्हते. अमित शहा यांनी खडसे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे जाहीर केले होते पण मुख्यमंत्र्यांना हा निर्णय दिल्लीतून अपेक्षीत होता. ते दिल्लीत गेले त्याहीवेळी याचे फायदे तोटे काय यावर चर्चा झाली होती. शेवटी नितीन गडकरींनी हे ऑपरेशन पार पाडावे असे ठरले आणि त्यानुसार पुढील सुत्रे हलली.
कथित पीएचे लाचखोरी प्रकरण, मोस्ट वॉँटेड दहशतवादी दाऊदचे कॉल प्रकरण, तसेच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण यावरून झालेल्या आरोपांच्या खिंडीत अडकलेले खडसे भाजपामध्ये एकाकी पडले. विरोधकांसह अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला घेरले. त्यामध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचाही समावेश होता. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खडसे यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावे. निर्दोषत्व सिद्ध करून सन्मानाने मंत्रिमंडळात यावे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी म्हटले होते. त्याचाच परिणाम म्हणून पक्षनेतृत्त्वाने अखेर खडसेंचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले आणि खडसेंना मंत्रीपद गमवावे लागले.
कारवाईसाठी दमानियांचे उपोषण
खडसे यांनी राजीनामा द्यावा, अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकून त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही गुरुवारपासून आजाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी आजाद मैदान गाठले. दामानिया यांना अनेक सामाजिक संघटना व समविचारी मंडळीकडून पाठिंबा मिळत आहे.
अजितदादांचा कित्ता?
आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता व नंतर आरोपमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देत ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते. खडसेंनी हाच कित्ता गिरवावा, असे त्यांच्या समर्थकांचे मत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर हवालाकांडात आरोप झाल्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला होता. खडसे यांनी असेच पाऊल उचलावे, असेही पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे होते.
काय आहेत खडसेंवरील आरोप ?
- कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, याप्रकरणी गजानन पाटीलला अटक करण्यात आली असून एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) चौकशी करत आहे.
- जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
- दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा दावा हॅकर मनिष भंगाळेने केला होता.
- भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वादामुळेही खडसेंच्या अडचणी वाढल्या.