लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असले तरी त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क सुरू आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मुनगंटीवार म्हणाले, भाजपामध्ये महाराष्टÑात सर्वांनीच उत्तम काम केले आहे. मात्र सर्वांच्याच मनासारखे होईल, असे नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडले असले तरी कार्यरत राहणे हीच भाजपाची शिकवण आहे. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना यासंदर्भात सर्व काही कल्पना आहे. त्यामुळे पक्षाची चौकट ते मोडणार नाहीत.
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारासंदर्भात ते म्हणाले, नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू असताना याच शहरात त्यांच्या वाहनावर गोळीबार होणे ही घटना धक्कादायक आहे. अधिवेशन काळातच महापौर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांची काय स्थिती, असा प्रश्न उपस्थित होतो. याप्रकरणी सरकारला सभागृहात जाब विचारला जाईल, असे त्यांनी सांगितले.तर मी भाजपमध्येच राहणार असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ते राष्ट्रवादी वा अन्य पक्षात जाणार असल्याच्या वृत्ताचा बुधवारी इन्कार केला. माझ्यावर अन्याय सुरूच राहिला तर वेगळा विचार करावा लागेल, असे सांगत खडसे यांनी अलीकडेच भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही त्यांच्यावरील अन्यायासंदर्भात आवाज उठविला होता पण आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे नंतर त्यांनी स्पष्ट केले.