मुंबई : पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या सक्तवसुली संचलनालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहिल्या. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात त्यांना बुधवारी हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्या वैद्यकीय कारणास्तव चौकशीला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.यापूर्वी ८ जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी याच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांनी कालावधी वाढवून घेतला होता. मंदाकिनी यांनी ईडीकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यानंतर चौकशीला हजर रहाण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचे पत्र ईडीला देण्यात आल्याचे समजते.
एकनाथ खडसेंची पत्नी ईडीच्या चौकशीला गैरहजर, भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 8:00 AM