मोठा दावा! "विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा वेगवेगळे लढतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:46 PM2024-01-29T15:46:25+5:302024-01-29T15:48:09+5:30
इंडिया आघाडी फार दिवस टिकणार नाही असं मी म्हणालो होतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
मुंबई - Prakash Ambedkar on Election ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात इंडिया आघाडीला आधी ममता बॅनर्जी आणि आता नीतीश कुमारांनी धक्का दिला आहे. महाराष्ट्रातही अद्याप जागावाटपावरून महाविकास आघाडीत अंतिम निर्णय झाला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीत जरी युती, आघाडी झाली तरी विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूने प्रत्येकजण वेगळे लढेल. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा हेदेखील वेगळे लढतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे कुणाला भीतात माहिती नाही. आमच्यात जे काही ठरले मी जाहीर केले. मी पत्रही जाहीर केले. आतापर्यंत आम्ही एकत्रित लढणार हे ठरलंय. उद्या काय होईल माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत कुणीही एकत्र लढणार नाही. दोन्ही बाजूने वेगवेगळे लढले जाईल. अजित पवार वेगळे लढतील, एकनाथ शिंदे वेगळे लढतील आणि भाजपाही वेगळे लढेल. महाविकास आघाडीतले पक्षही वेगळे लढतील. विधानसभा निवडणुकीत युती होईल ही अशक्य बाब आहे असं विधान त्यांनी केले आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
तसेच महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. ४८ जागा आहेत. त्यात जागांमध्ये सन्मान आणि वाटप करायला महाविकास आघाडीने शिकले पाहिजे. मी मागायला ४८ जागा मागू शकतो. परंतु बैठकीला बसल्यानंतर त्यावर समन्वयाने चर्चा झाली पाहिजे. बाहेर बोलणे आणि बैठकीतला संवाद हा वेगळा असतो. आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही २ लाखांची ताकद घेऊन आहोत असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही. जे काही पत्रव्यवहार झाला त्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे. ३० तारखेला पक्षाचे प्रतिनिधी बैठकीत जातील. इंडिया आघाडीचे अस्तित्व राहिलेले नाही. आप बाहेर पडला, टीएमसी बाहेर पडली आणि आता जेडीयू बाहेर पडला. सपा आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. कुठेतरी काँग्रेसनं आत्मपरिक्षण केले पाहिजे. मूठ बांधावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नाहीत. तो प्रयत्न नीतीश कुमारांनी केला. इंडिया आघाडी फार दिवस टिकणार नाही असं मी म्हणालो होतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे मराठा नेते म्हणून उदयास आले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत घोषणा केल्यानंतर मराठा समाजातील नेते फार झोपलेले आहेत. त्यांच्याबाबत चीड आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढली आहे. एकनाथ शिंदे या सर्व मराठा नेत्यांच्या वर आहेत ते दिसते. जरांगे पाटील यांच्या मोर्च्यातून, सभेतून जाणारा वर्ग वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचे समर्थन करत होते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाढवले पाहिजे अशी भाषा करत होते. सरकारचा निर्णय कोर्टात टिकेल की नाही हे माहिती नाही. परंतु या आंदोलनातून एकनाथ शिंदे मराठा नेते म्हणून पुढे आले हे दिसते. त्याचे पुढील २ महिन्यात मतांमध्ये रुपांतरीत किती होते हे पाहावे लागेल असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.