शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 08:57 AM2024-09-10T08:57:16+5:302024-09-10T09:00:06+5:30
महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांच्याकडे केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP Amit Shah ( Marathi News ) : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरुवातीला गैरहजर राहिल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र नंतर अमित शाह हे परतीच्या प्रवासाला निघण्याआधी अजित पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर शाह यांची भेट घेत चर्चा केली. एकीकडे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत आता आणखी एक माहिती समोर आली असून महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांच्याकडे केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते. याबाबत 'द हिंदू' या दैनिकाने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांच्या या मागणीला अमित शाह हे सहमती देणार का आणि या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष कसा प्रतिसाद देणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप किती जागांसाठी आग्रही?
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने किमान १५० जागा लढवाव्यात, यासाठी महाराष्ट्र भाजपमधील नेते आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीच्या जागावाटपात आपल्या वाट्याला किमान ७० जागा याव्यात, अशी अपेक्षा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे पाहावं लागेल.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर रविवारीच मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते. पण, अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली.