मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदिल्लीला गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मराठा आरक्षणाशिवाय दिल्ली दौऱ्यात राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप आणि आमदार अपात्रता कारवाई, यावर चर्चा होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे.
दरम्यान, सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागांत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यतावर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची 30 सप्टेंबर रोजी बैठक झाली होती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. पितृपक्षाच्या पंधरवड्यानंतर राज्यात सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली होती. आता पितृपक्षानंतर नवरात्रोत्सव ही संपला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.