एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:41 PM2023-10-03T17:41:47+5:302023-10-03T17:48:39+5:30
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण आहे काय, असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. तेव्हापासून अजित पवार नाराज असल्याचा चर्चा होत्या. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा अजित पवार गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आले. अजित पवार हे देवगिरी बंगल्यावर होते. तरीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला का आले नाहीत? तर यामागे ते आजारी असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या गैरहजेरीबद्दल प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अजित पवारांची तब्येत आज ठीक नाही आहे. त्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला आलेले नाहीत. त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पण राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.