महाराष्ट्रात ठाकरे सरकार जाऊन ३९ दिवस झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे. यामुळे छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एनबीटीने विश्वासू सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यानुसार भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक ८ आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. यामध्ये प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे ८ जण मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार सारखे माजी मंत्री देखील असतील.
पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. दानवे यांचे हे वक्तव्य व्हायरल होताच दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. शिंदे गटाचे खासदार आमच्यासोबत असून त्यांना विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही आमचा पक्ष मजबूत करत आहोत, तरीही शिवसेनेचे खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती वापरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
लवकरच चित्र स्पष्ट होणार- मुख्यमंत्री आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे परंतु या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी होणार नसून येत्या १२ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजामध्ये या याचिकेचा उल्लेख नाही. येत्या १२ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सोमवारी नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले.