शिंदे गटातून मंत्रिमंडळाची नावे ठरत नसल्याचे वृत्त असताना राजभवनात संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी लागली आहे. यामध्ये संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनातील खुर्च्यांवर नावे लावण्यात आली आहेत.
अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आणखी एक आमदार संजय शिरसाट शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजल्याने त्यांची आणि शिंदे यांची वादावादी झाल्याचे समजते आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे. संजय शिरसाटांचे नाव या खुर्च्यांवर नाहीय.
राजभवनात जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांची नावे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्च्यांच्या मागे ठेवलेल्या खुर्च्यांवर चिकटविण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.