लोकसभेतील पराभवाच्या झटक्यानंतर महायुतीत नाराजीचे वारे सुरु झाले आहेत. यावर उतारा म्हणून मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. महायुतीत एका पक्षाच्या लोकांनी दुसऱ्या पक्षाला मतदान केले नाही, मदत केली नाही यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी राज्यातील लोकांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आमच्यासाठी फडणवीसच आहेत, असे वक्तव्य केले आहे.
ठाण्यात महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अभिजित पानसे यांना मागे टाकले, योग्यवेळी ते पुढे येतील. ठाणे जिल्ह्यात ३३ टक्के मतदार आहेत. मोठ्या लोकांकडून कधी कधी छोट्या छोट्या चुका होत असतात. मात्र तुम्ही काळजीपूर्वक मतदान करावे, असे आवाहन नाईक यांनी पदवीधर मतदारांना केले.
एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत, असे नाईक यांनी सांगितले. तसेच राज्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच सर्वकाही आहेत. डोलारा किती मोठा त्यापेक्षा मनसे शिस्तबद्ध पक्ष आहे, असे नाईक म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असेही सूचक वक्तव्य नाईक यांनी केले. यावेळी फडणवीसही व्यासपीठावर उपस्थित होते.