यवतमाळ - किमान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतो अशी चर्चा तरी ठेवा असं पत्रकारांशी काहीजण बोलले. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लोक लावतात. एका माणसाला किती चेहरे असतात ते माझ्यापेक्षा कुणी ओळखू शकत नाही. ज्या आघाडीतल्या मित्रपक्षांनाही तुमचा चेहरा नकोसा झालाय त्याला जनता कशी स्वीकारेल असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
यवतमाळ येथे कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्यारितीने राजकारण करतायेत त्यांना उठता बसता, झोपतानाही एकनाथ शिंदे, महायुती सरकार आठवतंय. तुमच्या पोटात का दुखतंय, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून...गरीब कुटुंबातील आहे म्हणून...सोन्याचा चमचा घेतलेल्यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे का? आम्ही २४ तास काम करतोय. मी पहाटेपर्यंत काम करतो. अजितदादा पहाटेपासून कामाला सुरुवात करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण दिवसभर काम करतात असं २४ बाय ७ सरकार काम करतंय असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्या बहिणींना विनंती आहे, हे खोटेनाटे लोक आले तर त्यांना विचारा, तुम्ही आमच्यासाठी काय केले. तुमचे सरकार होतं तेव्हा काही दिले नाही. ५०-६० वर्षात कधी काँग्रेसला सुचलं? स्वत: राजीव गांधी म्हणाले होते केंद्राने १ रुपया दिला तर सामान्य जनतेपर्यंत पोहचेपर्यंत ते १५ पैसे होतात म्हणजे ८५ टक्के भ्रष्टाचार होत होता. आम्ही १५०० रुपये महिन्याला देतोय जर दुसरं सरकार असतं तर हातात ४०० रुपयेच पडले असते. आम्ही पूर्ण पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिले. तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठिशी कायम ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, आज बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जास्त आनंद मिळतो. जेव्हा मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यापेक्षा जास्त आनंद बहिणींकडे पाहून होतो. आमचं सरकार देणारे आहे घेणारे नाही. या योजना कायमस्वरुपी राहतील. ही योजना बंद करायला विरोधक कोर्टात गेले. का आमच्या बहिणींसाठी मिळणारे पैसे थांबवतो, तुमच्या छातीत धडकी भरते का? गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार का? असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.