Maharashtra Politics: गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक आज नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकनात शिंदे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात शिवसैनिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
"एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ही स्वकतृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा अभिनंदन," असे ट्विट राज ठाकरे यांनी केले.
शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छाशरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. ''एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे,'' असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार आणि जयंत पाटलांच्या शुभेच्छामहाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ''महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनात शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगाने पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो,' असे अजित पवार म्हणाले. तर, ''एकनाथरावजी शिंदे यांचे माझ्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्र हे एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी यांनी राज्याला अजून नव्या उंचीवर न्यावे, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो,'' असे जयंत पाटील म्हणाले.