Maharashtra Politics : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक आज नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करुन शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात शिवसैनिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची गोपनियतेची शपथ दिली. राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत शिंदे यांनी शपथ घेतली.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. आज सकाळी शिंदे हे गोव्यातून मुंबईत आले आणि थेट देवेंद्र फडणवीसांच्या सागर या बंगल्या भेट घेतली. त्यानंतर, तेथून ते राजभवनावर जाऊन राज्यपालांनाजवळ सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर आता शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.