एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:14 PM2023-09-05T13:14:13+5:302023-09-05T13:15:10+5:30

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar are not trustworthy; Sanjay Raut | एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

googlenewsNext

मुंबई – अजितदादा काय म्हणतायेत त्यावर काय बोलणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर विश्वास काय ठेवायचा. हे निष्ठेच्या आणाभाका घेऊन कशी बेईमानी करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे मराठा समाजाने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. आश्वासने देतात, खोट्या घोषणा करतात. एकाबाजूला चर्चा करतात दुसऱ्याबाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचे आदेश द्यायचे. त्यानंतर काखावर करणे हे यांचे धोरण आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाने जी भूमिका घेतली आहे, आंदोलन केले आहे. त्यापुढे सरकारने गुडघे टेकले आहेत ही चांगली गोष्ट आहे. जालनासारख्या जिल्ह्यात एका खेड्यात मनोज जरांगे पाटील सारखा कार्यकर्ता उपोषणाला बसतो. त्याच्यावर इतका दबाव येऊनही तो झुकत नाही. त्याचे कौतुक महाराष्ट्राला आहे. सरकारची वचने पोकळ आणि फसवी होती. सरकारचे आमदार, मंत्री तिथे गेले होते. आंदोलन संपले का? उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले का तर नाही. ते तुमच्या ५० खोक्यांनी विकले जाणारे लोकं नाही. फाटके लोकं आहेत. साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच हरीश साळवी खूप मोठे वकील आहेत. त्यांचे लग्न झाले ही वैयक्तिक गोष्ट आहे. लंडनमध्ये त्यांनी लग्नाची पार्टी दिली त्याठिकाणी मोठमोठे व्यक्ती हजर होते. हादेखील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाच्याही खासगी आयुष्यात राजकारण झाले नाही पाहिजे. परंतु त्या पार्टीत ललित मोदी आले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीत येथील ईडी त्यांना शोधत आहे. ललित मोदीला पळपुटा घोषित केले आहे. हरिश साळवींच्या पार्टीत ते उपस्थित होते. ते सरकारने गठीत केलेल्या वन नेशन वन इलेक्शन या समितीतील सदस्य आहे. त्यांच्या पार्टीत ललित मोदी चेअर्स करतायेत. यावर भाजपाने, अमित शाहने भाष्य करायला हवे. आता ईडी, सीबीआय काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, भाजपा आणि सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर लंडनच्या पार्टीवर खुलासा करावा. वन नेशन वन इलेक्शन समितीत हरिश साळवींचा समावेश असणार का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे त्यावरही सरकारने बोलावे असं आव्हान राऊतांनी दिले आहे.

Web Title: Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar are not trustworthy; Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.