मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ३० जून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर महिनाभराने शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी ९ जणांना समावेश करण्यात आला होता.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात अपक्ष, मित्रपक्षांना सामावून घेण्यात आले नाही. तर शिंदे गटातील अनेकांना यादीत स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. अशातच दुसऱ्या विस्तारात स्थान दिले जाईल असं आश्वासन शिंदेंनी नाराज आमदारांना दिले. राज्यातील गणेशोत्सव संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल असं सांगण्यात येत होते. परंतु आता हा विस्तार दिवाळीपूर्वी होऊ शकतो असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावलेल्यांना आणखी काही दिवस वेटिंग लिस्टवर राहावं लागणार आहे.
सूत्रांनुसार, दुसऱ्या टप्प्यात २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यात ७ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. यात शिंदे गटाला आणखी ४ कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नाराजांची दुसऱ्या कॅबिनेट विस्तारात वर्णी लागणार का हे पाहणे गरजेचे आहे. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात महत्त्वाची खाती अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवली आहेत.
खात्यांवरूनही मंत्री नाराज?मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज होते. त्यातील काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत खातेवाटपावरून मंत्रीही नाराज असल्याचं समोर आले होते. त्यात नाराज आमदारांवर उद्धव ठाकरे गटाचे लक्ष आहे. नाराजी कायम राहिली तर या आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे गट सक्रीय आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अत्यंत सावध पावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उचलावी लागतील अन्यथा आमदारांच्या नाराजीमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.