शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लावला 'असा' अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:18 PM2022-11-04T15:18:38+5:302022-11-04T15:22:28+5:30
शिंदे-फडणवीस सरकार तोपर्यंत चालणार जोवर त्यांच्याकडे १४५ चं बहुमत आहे असं अजित पवारांनी सांगितले.
शिर्डी - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. ते कोसळेल हा दावा अनेकदा विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु कुणीही डेडलाईन देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय अधिवेशन शिर्डीत होत आहे. यात जयंत पाटलांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या या दाव्यासाठी त्यांनी राजकीय अंदाज समोर ठेवला.
जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाले तेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. याठिकाणी जेव्हा जेव्हा कुठल्या पक्षाचं अधिवेशन झाले तेव्हा त्यावेळचं सरकार कोसळलं आहे असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या विधानाला दुजोरा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकार कोसळण्याचं भाकीत केले.
शिंदे-फडणवीस सरकार तोपर्यंत चालणार जोवर त्यांच्याकडे १४५ चं बहुमत आहे. हा आकडा जसा जाईल राज्यातील सरकार कोसळेल असा दावा अजित पवारांनी केला. त्यासाठी २ संकेत त्यांनी दिले. त्यात सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र करण्याबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. जर कोर्टाने एकनाथ शिंदेंसह १६ जणांची आमदारकी रद्द केली तर शिंदे-फडणवीस सरकार अल्पमतात येईल आणि कोसळेल. दुसरं म्हणजे मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळात येण्यासाठी अनेक उत्सुक आहेत त्यामुळे मंत्री कुणाला बनवायचं यावरून शिंदे गटात पेच आहे.
नाराजांना पुन्हा घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की, शिंदे गटातील संजय शिरसाट यांच्यासह काही आमदार पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना परतायचं. मातोश्रीचे दरवाजे अद्याप कुणाला बंद झाले नाहीत असं सांगत अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांना साद घातली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी, ठाकरे गटातील अनेक नाराज आमदार भाजपाच्या आणि शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राहिलेल्या आमदारांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी अशाप्रकारे अफवा पसरवली जात असून काही दिवसांत त्यांचेच आमदार आमच्याकडे येतील असा दावा खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"