Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर काही वेळातच नव्या सरकारने फडणवीस सरकारच्या काळात असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित केली. तर वाद सुरू असलेल्या मेट्रोचे कारशेड आरे येथेच होईल असाही निर्णय घेतला. या निर्णयांवरून राष्ट्रवादीने नव्या सरकारवर सवाल उपस्थित केले.
"मेट्रो कारशेड पुन्हा आरे मध्येच होणार? असं दिसतंय की नव्याने स्थापन झालेल्या सरकारला काही ठराविक लोकांना खुश करण्याची प्रचंड घाई झालेली आहे. नवं सरकार नक्की कोणाला खुश करण्यासाठी सत्तेत आलंय? जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे मारले होते, ती योजनाही पुन्हा सुरू करण्यात आली? व्वा रे 'ईडी' सरकार", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून भाजप त्यांना पाठिंबा देईल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी बोलताना फडणवीस मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, या घोषणेनंतर दोन तासांच्या आत चक्र फिरली आणि शपथविधीआधी भाजपाच्या केंद्रीय पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले. शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पण भाजपाचे वरच्या फळीत नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि समर्पण म्हटले.