मुंबई - मागील ३ आठवड्याहून अधिक काळ राज्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २ जणांचं मंत्रिमंडळ विविध निर्णय घेत आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल वारंवार विचारला जात आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनीही सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. त्यात आज पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत.
देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. सूत्रांनुसार, दिल्लीत शिंदे-फडणवीस यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असून महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्तारावर यात चर्चा होईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी आतापर्यंत मुंबई-दिल्ली अनेक चकरा मारल्या आहेत. सत्ता आल्यापासूनही ५ वेळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत.
भाजपाचे आमदार आणि शिंदे गटातील बंडखोर ४० आमदार हे सर्व मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दादा भुसे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांसारखे अनेक फुटीर आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या तीन पक्षाच्या 'महाविकास आघाडी' सरकारमध्ये मंत्री होते. सेनेच्या बंडखोर गटाने कुठल्याही पदाचं आमिष नसून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उठाव केल्याचं सांगितले असले तरी मंत्रिमंडळातील पोर्टफोलिओ वाटपावर उत्सुकतेने लक्ष ठेवले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यात ८ मंत्र्यांचाही समावेश होता. त्यातील ४ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री होते ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोलाची भूमिका निभावली. हे नव्या सरकारमध्ये नवी जबाबदारी घेण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले. तेव्हा पहिल्या ४० दिवसात केवळ ७ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २५ दिवस उलटले तरी केवळ टू मॅन शो सरकार सुरू आहे. ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला होता.
सूत्रांनुसार, मंत्रिमंडळाची अंतिम यादी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने तयार केली जाईल. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. १८ जुलै रोजी सुरु होणारं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन राष्ट्रपती निवडणुकीमुळे पुढे ढकललं. परंतु त्याची पुढील तारीख कळवली नव्हती. आता हे अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडू शकतो.