रत्नागिरी - आपले सरकार राज्यात आले आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. कोकणवासियांना गावापर्यंत पोहचण्यास कुठलेही विघ्ने आली नाही. एकनाथ शिंदे यांनी चोख काम बजावलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत अनेक चांगले निर्णय घेतले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला. पोलिसांना १५ लाखांत घरे जे दिवसरात्र लोकांसाठी काम करतात हा निर्णय जे मागच्या काळात उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते या सरकारनं केले अशा शब्दात माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे.
रामदास कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरचं काम प्रगतीपथावर आणलं. एकनाथ शिंदे यांच्या मुलाने ४०० एसटी बसेस कोकणवासियांसाठी मोफत सोडल्या. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी असं करणे हे पहिल्यांदाच घडलं आहे. स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला असं काम एकनाथ शिंदे यांचे सुरू आहे. चांगले निर्णय घेतायेत. दिवसरात्र काम करतात. मंत्रालयात भेटतात. याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तसेच मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही अनुभवी नेते आहेत. एक से भले दो...दोघं एकत्र येत महाराष्ट्राच्या विकासाचा गाढा पुढे नेतायेत. हा मुख्यमंत्री आमचा आहे अशी भावना लोकांच्या मनात आहे. मी कोकणवासियांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असंही रामदास कदमांनी सांगितले.
याआधीही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर साधला होता निशाणाकदमांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. कदम म्हणाले होते की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
२०१९ मध्ये आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करू नका. ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल अशी आपल्याला विनंती केली. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.