- अजय पाटील जळगाव : मार्च २०२१ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भाजपचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावून, जळगाव महापालिकेतील अडीच वर्षांची भाजपची सत्ता उलथवून लावली होती. तसेच भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी आम्ही शिवसेनेत गेलो नसल्याचे सांगत, आम्हीच भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत, भाजप गटनेतेपदावरदेखील दावा केला होता. आता हाच पॅटर्न राज्यातील सत्तांतराच्या राजकारणात एकनाथ शिंदेंकडून गिरवला जात असल्याची शक्यता आहे.
वेगळा गट न स्थापता... म्हणजे शिवसेनेला मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ नगरसेवकांनी वेगळा गट न स्थापन करता आमच्याकडे जास्त नगरसेवक असल्याने आम्हीच खरे भाजपचे नगरसेवक असल्याची भूमिका घेत भाजपचे जळगाव महापालिकेतील गटनेते भगत बालाणी यांची हकालपट्टी करीत दिलीप पोकळे यांना गटनेतेपद जाहीर केले होते.
एकनाथ शिंदे यांची खेळी सद्य:स्थितीतील राजकीय घडामोडींत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंड पुकारले असून, त्यांनी आम्हीच शिवसेनेचे असून, शिवसेनेने नियुक्त केलेले गटनेते अजय चौधरी मान्य नसल्याचे म्हटले आहे.
काय आहेत समान दुवे... १ महापालिकेत भाजपची सत्ता येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली होती. त्यानंतरच महापौरबदलाच्या वेळेसच भाजप नगरसेवकांनी बंड पुकारले. - महाराष्ट्रातील मविआची सत्ता येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना, शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारले. २ महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला समर्थन करून, महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसविला होता.- राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपला समर्थन देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
३ महापालिकेत बंडखोरी केल्यानंतर आमचा गट स्थापन झाल्याचा दावा करत, भाजप बंडखोर नगरसेवकांनी आम्हीच खरे भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत थेट भाजपच्याच अधिकृत गटनेत्यांसह नगरसेवकांना व्हिप बजावला होता. तसेच त्यांनाही अपात्र करण्याची मागणी केली होती.आता शिवसेनेविरोधात बंड पुकारून आम्हीच शिवसेनेचे खरे आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांकडून केला जात असून, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच अपात्र करण्याची भूमिकादेखील एकनाथ शिंदेंनी घेतल्याची चर्चा आहे.
४ जळगाव महापालिकेतील सत्तांतराच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे हेच होते. शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत यांनाही याबाबत माहिती न देता, सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. राज्यातील होऊ घातलेल्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी आतादेखील एकनाथ शिंदे हेच आहेत. या बंडाबाबत त्यांनी मविआतील सहभागी पक्षनेत्यांसह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनाही दूर ठेवले. तसेच सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ५ जळगाव महापालिकेचे नेतृत्व हे जिल्ह्याचे भाजपचे सर्वोच्च नेते गिरीश महाजन यांच्याकडे होते. या सर्वोच्च नेत्याविरोधात जाऊन भाजपच्या नगरसेवकांनी बंड पुकारले होते. राज्याचे शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतात. आता शिवसेनेच्या आमदारांनी थेट सर्वोच्च नेते असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.