एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी रंगत आहेत. दरम्यान, काल आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना नवा दावा केला होता. भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय यंत्रणा पकडून नेतील असं म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरून नव्या चर्चेला उधाण आले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी एका वाक्यात आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० लोक हे स्वत:च्या जागा आणि पैशांसाठी भाजपासोबत गेले आहेत. अन्य कुठलेही कारण त्यांच्याकडे नव्हते. भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील, उचलून नेतील म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत.घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.