मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा उमेदवारांची शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वीच मंत्रिपद मिळत नसल्याने नाराज असलेले संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. तर शिंदे यांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेतच बंड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारी माघारी घेणार की बंडखोरी सुरुच ठेवणार यावर आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया आली आहे.
संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. मी बंड केलेले नाही, मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. अर्ज माघारी घेण्याच्या ४ तारखेनंतर कळेल काय होते ते, असे सूचक विधान गायकवाड यांनी केले आहे.
मला लोकसभा निवडणूक लढवावीशी वाटली म्हणून मी अर्ज दाखल केला आहे. तूर्तास तरी माघार नाही, असे गायकवाड म्हणाले आहेत. हा अर्ज मी अचानक दाखल केलेला नाही. मी आधीच ठरविले होते. फक्त दरवेळेच्या चाळीस-पन्नास हजार लोकांऐवजी पाच जणांना नेत अर्ज दाखल केला, हाच फरक आहे असे गायकवाड म्हणाले आहेत.
जे काम करत नाहीत, लोक ओळखत नाहीत असे लोक निवडणूक लढविण्याची तयारी करतात. मी तर चौवीस तास काम करतो, जाधवांशी भेट झाली परंतु अर्ज मागे घेण्य़ावर चर्चाच झाली नाही, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.