लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या वैधतेला दिलेले आव्हान आणि आमदारांच्या अपात्रतेसंबंधातील याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात ३० जूनला शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच प्रकरण न्यायालयात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने एकमेकांविरुद्ध याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. शिंदे सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका तसेच शिंदे गटातील आमदारांना ठाकरे गटाने अपात्र ठरविणे, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याचे सांगत शिंदे गटाने सादर केलेली याचिका आणि शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावणाऱ्या विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका, या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.
राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भातील आव्हान-प्रतिआव्हान याचिका घटनापीठाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय बुधवारी देईल काय, या बाबतही उत्सुकता आहे. या आधी २० जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि न्या. हिमा कोहली यांनी काही मुद्यांवर हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे लागेल असे म्हटले होते.