औरंगाबाद
राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेलं सरकार फार काळ टीकणार नाही. एकदा का मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की यांच्यात मारामाऱ्या होतील, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बरेच दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्यावरुन आता शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात पूरामुळे लोकांचे जीव जात आहे, कोरोना आहे पण सरकार अस्तित्वात नाही, असा टोला लगावला. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर जोरदार हल्ला करत हे सरकार फार काळ टिकणार नाही, फुटलेल्या आमदारांना पश्चाताप होईल आणि ते परत उद्धव ठाकरेंकडे येतील, असं म्हटलं आहे.
"राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मारामाऱ्या होतील. या माऱ्यामाऱ्या वैचारिक असतील. आजकाल सगळे सत्तेचे भुकेले झालेले आहेत. त्यामुळेच हे ५० आमदार एकत्र आले आहेत. मुंबईत सुरू असलेलं यांचं शक्तीप्रदर्शन फक्त मंत्रिपदासाठीच आहे. आता ५० लोकांमध्ये १३ मंत्रिपदं दिली तर बाकिच्यांचं आहे. तिकडे भाजपाचे ११६ जण आहेत. मग ते काय महत्वाची खाती सोडणार आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजी निर्माण होईल आणि फुटलेल्या आमदारांना पश्चाताप होईल", असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
राज्यपालांचा राग येतो- चंद्रकांत खैरे"राज्याचे राज्यपाल आमचे चांगले मित्र होते. पण आता मला त्यांचा प्रचंड राग येतो. ते घटनाबाह्य काम करत आहेत. त्यांनी खरंतर घटनेला अनुसरून काम करणं अपेक्षित आहे", असंही खैरे म्हणाले.