एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल ४० दिवसांनी होणार आहे. शिंदे गट हा शिवसेनेचा बंडखोर गट आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री देखील या गटात सहभागी झाले होते. शिवसेनेचे ४० आमदार आणि सहा ते ९ मंत्रिपदे असे कोडे एकनाथ शिंदे यांना सोडवायचे आहे. मंत्रिमंडळाची शपथ काही तासांवर आलेली असताना अद्यापही शिंदे गटातून नावांची निश्चिती झाली नसल्याचे समजते आहे.
भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे सहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रात्री उशिरा समोर आली होती. परंतू, शिंदे गटात अस्वस्थता असल्याने शिंदे गटाचे ९ जण शपथ घेण्याची शक्यता आहे. परंतू, अद्याप शिंदे गटात मंत्रिपद कोणाला मिळणार याची यादी निश्चित झालेली नाही. यामुळे शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्व आमदारांना एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीपूर्वीच शिंदे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री उदय सामंत, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील पोहोचले आहेत. शिंदे गटातून सहा नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे, तर अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि भरत गोगावले यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद द्यायचे यावर खल सुरु आहे. सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात आल्याने त्यांच्यासमोर अडचण आहे. संजय राठोड यांचे नाव ठाकरे सरकारमध्ये असताना तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आले होते. तर दीपक केसरकर यांनी देखील मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केल्याचे समजते आहे. रत्नागिरीचे उदय सामंत हे ठाकरे सरकारमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते, दोन लगतच्या जिल्ह्यांत दोन मंत्रिपदे पहिल्याच विस्तारात देणे शिंदेंना शक्य नाहीय.
याशिवाय भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत, त्यांनाही त्यांच्या पदाप्रमाणे मंत्रिपद देणे हे शिंदेंसमोर आव्हान आहे. त्यातच शिंदे गटातील १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आल्याने मंत्रिपदावरू शिंदे गटात नाराजी तर नाहीय ना, असा सवाल उपस्थित होत आहे.