Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही तीव्र होताना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत शिवसंवाद यात्रा सुरू आहे. बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले असते का, अशी विचारणा शिंदे गटातील नेत्याकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले रामदास कदम यांनी आता आदित्य ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. केवळ स्वार्थासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेबांनी हे करायला परवानगी दिली असती का? असा प्रश्न शेंबड्या मुलाला जरी विचारला असता तरी उत्तर हे नाही हेच असते, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत
पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे राज्यभर फिरत आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडे, पक्षाचे दरवाजे उघडे, असे म्हणतायत. राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. बाप-बेटे दोघे आमदार, खासदार मंत्र्यांना भेटले असते, तर आज वणवण भटक्याची गरज नव्हती. पण त्याचा आता उपयोग नाही. सत्ता असतानाच ही भूमिका घेतली असती तर ही दुर्देवी वेळही आली नसती, असे सांगत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना कदापी मान्य झाले नसते
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करुन यांनीच खऱ्या अर्थाने गद्दारी केली होती. सध्याचे सरकार हे जनतेच्या मनातले आहे. जनतेला तर नाहीच पण बाळासाहेब ठाकरे यांना देखील हे कदापी मान्य झाले नसते. आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना कधीच अशा युतीमध्ये सहभागी होऊ दिले नसते. मात्र, जे झाले स्वार्थासाठीच झाले, या शब्दांत कदम यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला.
दरम्यान, योगेश कदम आणि आदित्य ठाकरे हे मित्र असल्याचे सांगितले जात होते, पण वास्तव हे वेगळेच होते. दापोलीच्या नगरपरिषदेची सूत्रे ही योगेश कदम यांच्याकडेच होती. पण यामध्ये राजकारण करीत ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्यात आली होती. त्यावेळी तुमची मैत्री कुठे गेली, असा उलटप्रश्न रामदास कदम यांनी केला आहे.