मुंबई - वडिलांचं कर्तृत्व मुलासोबत असायला हवे. वडिलांचे कर्तृत्व असेल तर मुलगा पुढे जातो. मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा वडिलांचे कर्तृत्व १०० टक्के होते. त्यांचे काम होते म्हणून जनतेने मला निवडून दिले. मी जनतेचे काम केले. परंतु वडिलांचे कर्तृत्व नसेल तर निवडणुकीत पराजय होतो हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे असं सांगत शिंदेसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
समाधान सरवणकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचणारे बॅनर शिवसेना भवनासमोर लावले. त्यात गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय असा सवाल करत मनसेला टार्गेट केले आहे. त्यानंतर मनसेकडून झालेल्या टीकेवर समाधान सरवणकरांनी हे भाष्य केले. समाधान सरवणकर म्हणाले की, स्वत:ला हिंदू नेते म्हणवता, प्रत्येकवेळी हिंदूंना टार्गेट करायचे. ६० कोटी हिंदू एका जागेवर येतात. त्या कुंभमेळ्यावर वारंवार टीका करता. जगभरातून इथं श्रद्धाळू येतात, कुंभमेळ्यातील स्नानावर बोलता. दरवेळी हा विषय का घेतला जातो. हिंदूंच्या श्रद्धेला हात घालून राग येईल अशा गोष्टी वारंवार का करतोय हा आमचा सवाल आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच हिंदू एकत्र येतो, तेव्हा वाद का घातला जातो हा आमचा साधा प्रश्न आहे. ज्या बाल्याने माझ्यावर टीका केली त्याला समजायला हवं. प्रत्येकाला वडिलांचा आदर असतो. माझ्या वडिलांचे या विधानसभा मतदारसंघात काम आहे. तुम्ही मनसेचे जे उमेदवार उभे केले ते कितव्या स्थानावर होते हे महाराष्ट्राला सांगा. त्यामुळे कुणाची किती बुद्धी हे मतदारांनी दाखवले आहे. दरवेळी वेगवेगळे विचार आणि भूमिका घेऊन मतदारांसमोर जात असतात. आज मराठी माणसांनीच तुम्हाला नाकारले आहे असंही समाधान सरवणकर यांनी टीका केली.
दरम्यान, शिवसेना-भाजपा युती आहे. महापालिका निवडणुकीत आमच्याच जागा सर्वाधिक येतील. हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. राज ठाकरेंनी ताकद विधानसभेला पाहिली. ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेत. मतदारसंघात ६ महापालिका वॉर्ड आहेत. त्यात एकाही वॉर्डात ते लिडवर नाहीत. इथे फक्त शिवसेना-भाजपा हिंदुत्ववादी विचारांची ताकद आहे. याठिकाणी सहाही नगरसेवक आमचे निवडून येतील. मनसेला लोकांनी नाकारले आहे. त्यांच्याकडे दाखवण्यासारखे काम नाही. निवडणुकीच्या काळात हिंदू आठवतो. मराठी मतदारांसाठीही त्यांनी काय केले नाही. आमच्यावर जो टीका करेल त्याला तसेच उत्तर देऊ. आम्ही घाबरत नाही असा निशाणाही समाधान सरवणकरांनी मनसेला लगावला.