Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, राज्यभरातून एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे. यातच आता शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
किती दिवस लोकांच्या तोंडाकडे बघायचे? लोकांकडे वर्गणी मागायची. आमच्या वर्गण्यांची संभावना तुम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी) खंडणी म्हणून केली. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही आम्हाला लाचार व्हायला लावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोंडाकडे आम्हाला बघायला लावले. ही लाचारी आम्हाला मान्य नव्हती, असा हल्लाबोल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला.
स्वाभिमान दुखावण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने केले
आम्ही १९९५ चे युती सरकार बघितले. त्यावेळी शिवसेनेने १ रुपयात झुणका भाकर विकायला लावली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आले. १० रुपयांत तुम्ही शिवभोजन थाळी विकायला लावली. एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालये देत आहेत, मोठी पदे देत आहेत आणि माझा शिवसैनिक एक रुपयात झुणका भाकर विकतोय. १० रुपयांत शिवभोजन थाळी विकतोय. त्याचा स्वाभिमान दुखावण्याचे काम या मागच्या सरकारने केले, असा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केला.
तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती
तुम्हाला कुठेतरी पदावर बसायचे होते. तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. तुम्हाला सत्ता भूषवायची होती. म्हणून ज्या लोकांनी ३५-३७ वर्षे आमच्यावर अत्याचार केले. त्यांना तुम्ही जवळ करून बसलात. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला आणि आमचे निर्दालन केले. कुठचे पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वमान्यांना न्याय नव्हता, असा घणाघात हेमंत पाटील यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे कशाप्रकारचा घडलेला माणूस आहे. दररोज २०-२० तास काम करतात. कधी मास्क नाही. कुणी हात पुढे केला तर लगेच हात मिळवतात. कुठलीही अस्पृश्यता बाळगत नाही, असे म्हणत हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.