Maharashtra Politics: दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. यातच शिंदे गटही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. यातच शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गट म्हणून आम्ही दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. उद्धव ठाकरे यांचा गट केवळ महाविकास आघाडीतील एक घटक असल्याचे टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला आहे.
शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दसरा मेळाव्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत स्पष्ट भाष्य केले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा संपूर्ण देशाला मिळते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट म्हणून आम्ही महापालिकेत अर्ज केला आहे. दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे, असे शेवाळे म्हणाले.
ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारा गट नाही. त्यामुळे परवानगी कोणाला द्यायची? यावरून महापालिकेपुढे कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटले पाहिजे. शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत, असे राहुल शेवाळे यांनी नमूद केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची स्पष्ट भूमिका मांडावी. असे झाले तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल. या भूमिकेचे आम्हीही स्वागत करू, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.