Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच या सर्व बंडखोरांना कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अगदी शेवटी बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना एका कार्यकर्त्यांनी केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाच्या अनेक आमदारांचे कार्यकर्त्यांसोबतचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांकडून जाणीवपूर्वक हा फंडा वापरला जात असल्याची चर्चा होती. मात्र, अगोदर कामाला येत असलेला हा फंडा आता याच आमदारांच्या अंगलट येताना दिसत आहे. कारण काही शिवसैनिक हे फोन करून बंडखोर आमदारांचीच फिरकी घेताना दिसत आहेत. शिंदे गटातील हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याबाबतही असाच किस्सा घडला आहे.
आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!
संतोष बांगर यांनी अलीकडेच शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने फोन केला होता. त्यावेळी हा कार्यकता संतोष बांगर यांच्याकडे उसने पैसे मागत होता. त्याच्या बोलण्याचा एकूण रोख खोचक होता. फोनवरून हा शिवसैनिक संतोष बांगर यांना म्हणाला की, साहेब, मला ५० एक लाखांची अडचण होती. तुम्हाला ५० कोटी भेटले असतील ना. मला खरंच अडचण होती. आता मला ५० लाख रुपये द्या.सहा महिन्यांत पैसे माघारी देतो, असे या कार्यकर्त्याने म्हटले. त्यावर संतोष बांगर हे चांगलेच वैतागले होते. त्यांची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लीपसंदर्भात अद्याप कोणाकडूनही पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, संतोष बांगर यांच्याकडून या सगळ्या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
दरम्यान, दुसऱ्या एका फोन कॉलवर एक शिवसैनिक संतोष बांगर यांना जाब विचारताना ऐकायला मिळत आहे. हा शिवसैनिक संतोष बांगर यांना उद्देशून म्हणाला की, आपल्याला गद्दार बोलणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असे तुम्ही शिवसैनिकांना म्हणाला होतात. तुम्ही गोरगरिबांची पोरं असलेल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्यांच्या कानाखाली आवाज काढायला सांगता. तुम्ही स्वत: गद्दार बोलणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा ना. गोरगरिबांच्या पोरांना कशाला चिथावणी देता, असे या कार्यकर्त्याने म्हटले. यावर संतापलेल्या संतोष बांगर यांनी फोन कॉलच कट केला होता.