Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असताना, शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही वाढत आहे. यातच शिवसेनेतीलच एका आमदाराने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटावावे आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हावे, अशी गळ घातली होती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा
ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख यांच्यासह मी स्वत: होतो, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले होते, असे भुमरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनादेखील भेटत नव्हते. लाजेखातर पक्षप्रमुख आम्हाला भेटतात असे खोटे बोलावे लागत होते, अशी खंत भुमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, युतीच्या नावावर मते घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्हीच गद्दार असल्याचा घणाघातही भुमरे यांनी केला. युती तुम्ही तोडली. मात्र, जनता आम्हाला जाब विचारत होती असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचा कारभार अडीच वर्ष ऑनलाईनच झाला, या शब्दांत भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.