प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क | कराड: अजित पवार यांना आता राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणिचं जास्त कळायला लागलं आहे. असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटाच्या आमदारांच्यात धुसफूस वाढेल असे पवारांनी विधान केले होते याबाबत छेडले असता शहाजी पाटील बोलत होते. कराड येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार शहाजी पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिजीत माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? यावर खरंतर अधिकारवाणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलू शकतात. पण विरोधक त्याची वेगळी चर्चा करीत आहेत. कोर्टकचेरीच्या भानगडीतून आठ दिवसात बाहेर पडू व मंत्रिमंडळाचा विस्ताराचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने सचिवांना सगळे अधिकार दिले आहेत हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सचिवांनी ठेवलेल्या फाईलवर मंत्र्यांची सही झाल्याशिवाय निर्णय मंजूर होतात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची सारखी दिल्लीवारी सुरू आहे. याबाबत विचारले असता, केंद्र सरकारशी सुसंवाद असल्याशिवाय राज्य सरकारला फायदा होत नाही असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात मोठी आपत्ती परिस्थिती आहे त्याला चांगली मदत व्हावी म्हणून हे दौरे होत आहेत असे सांगत नजीकच्या काळात आपल्याला चांगला निधी मिळाल्याचे पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या पासून दूर करण्यासाठीच त्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे. असे त्यांचे भाऊ म्हणत आहेत याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, संजय राऊत यांना त्यांचे मत मांडण्यासाठी ईडीने संधी दिली होती. इथे कायद्यासमोर सगळे समान आहेत त्यांनी उगाच आपण वेगळे असल्याचा आव आणू नये.
आम्ही शिवसेनेचे आमदार, एकनाथ शिंदे आमचे नेते!
आदित्य ठाकरे आम्हाला बंडखोर, शिंदे गट असे म्हणत असले; खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असले तरी तो त्यांचा प्रश्न आहे .ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. पण आम्ही बंडखोर नाही तर शिवसेनेचेच आमदार आहोत आणि एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. असेही शहाजी पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.