लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक मंगळवारी भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात युतीचे सरकार असताना नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडणे अयोग्य आहे. यातून आमदार गणेश नाईक यांनी राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडविल्याची टीका महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी बुधवारी केली.
आम्ही धक्के दिले तर ते त्यांना सहन होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप व शिवसेनेची युती असताना नवी मुंबईतही एकमेकांशी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. चौगुले यांनी नाईकांवर टीका केल्यामुळे पुढील काळात शिंदे गट व भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
- भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी बुधवारी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
- दिघामधील गरजेपोटी बांधलेली घरे व इतर समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदनही त्यांनी दिले. प्रश्न सोडविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.