पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेला ग्रहण लावले असतानाच त्यांच्याविषयी पुण्यातील न्यायालयात एक खासगी याचिका दाखल करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे यांनी दोन शपथपत्रांत १९८१ मध्ये दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये ११ वी पास झाल्याचे नमूद केले आहे.
या उमेदवारी अर्जाबरोबर आपली मालमत्ता व शैक्षणिक अर्हतेविषयी शपथपत्र सादर करावे लागते. याबाबत अभिजित खेडकर आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी खासगी याचिका दाखल केली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक शपथपत्रात अनेक तफावती असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात उच्चतम शैक्षणिक अर्हतेत ते न्यू इंग्लिश हायस्कूल, ठाणे येथून १९८१ मध्ये ११ वी पास असल्याचे नमूद केले आहे, तर २००९ उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी उच्चतम शैक्षणिक अर्हतेत मंगला हायस्कूल ठाणे (पूर्व ) येथून १९८१ मध्ये ११ वी पास असल्याचे नमूद केले आहे.
नामनिर्देशन अर्जात अनेक तफावतीएकनाथ शिंदे यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरिता दिलेल्या नामनिर्देशन अर्जात अनेक तफावती दिसून येत आहेत. २०१४ च्या शपथपत्रात त्यांनी पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे, तर २०१९ च्या शपथपत्रात त्यांच्या पत्नीने वागळे इस्टेट येथील दुकानाचा गाळा २० नोव्हेंबर २००२ रोजी खरेदी केल्याचे नमूद केले आहे.