राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर आहेत. या दौ-याची सुरुवात आज लातूर येथे झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांनी हे विधान केलं.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला, पण त्यांनी हा गुलाल का उधळला हे जाहीर केले नाही. जरांगे पाटील व त्यांच्यात काय बोलणी झाली हे आम्हाला माहित नाही. सर्व पाप सरकारने करायचे आणि खापर विरोधी पक्षावर फोडायचे हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी थांबवले, असा प्रश्न विचारून त्यांना आरक्षण द्यायचे नाही तर दोन्ही समाजात भाडंणे लावायची आहेत. फोडा व राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर भाजपा करत आहे. मनुवादी व्यवस्था हवी की शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हवा याचा विचार जनतेने करायचा आहे, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी पुढे सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीने एक जागा जिंकली. पण विधानसभा निवडणुकीला मात्र मराठवाड्यातून महायुतीचा सुपडासाफ करा. विधानसभा निवडणुकीत मविआ १८५ पेक्षा जास्त जागा जिंकेल व राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जातील, असे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले.