CM Eknath Shinde vs NCP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच शिर्डी दौऱ्यावर गेले होते. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री मिरगाव (सिन्नर) मध्ये ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. 'मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजत आहे. हे खरं असेल तर ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे,' अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. पण, मुख्यमंत्री भविष्य बघायला गेलेले नव्हते असे स्पष्टीकरण देण्यात आले. साहजिकच, हे स्पष्टीकरण आल्यानंतरही हे प्रकरण शमलेले नाही. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यंगचित्रातून फटकारे लगावत खोचक टीका केली.
'माझं काय होईल' ... 'यांचं भविष्य माझ्या हाती' अशा आशयाचे व्यंगचित्र काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शिंदे - फडणवीस सरकारची खिल्ली उडवली. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'हात' दाखवायला ज्योतिषाकडे गेल्याचे माध्यमातून समजले. त्याच गोष्टीचा धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी ज्योतिषाकडे नाही तर फडणवीसांच्या हातात तुमचे भविष्य आहे असे सूचवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'माझं काय होईल' असे फडणवीस यांना हात दाखवत विचारत आहेत आणि देवेंद्र फडणवीस 'यांचं भविष्य माझ्या हाती' असे बोलत असल्याचे हे व्यंगचित्र क्लाईड क्रास्टो यांनी काढत एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे तुमचं सरकार अंधश्रध्देवर किती काळ टिकणार हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे, अशा आशयाचे मत क्लाईड क्रास्टो यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी काय दिले स्पष्टीकरण
मुख्यमंत्री शिंदेंनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिर्डी दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांना सुनावले. "कॅप्टन खरात म्हणून माझे एक मित्र आहेत. त्यांचे ईशान्येश्वर हे मंदिर आहे. तेथे गोशाळा व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक देणगी दिली होती. त्यामुळे कॅप्ट खरात यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदा ईशान्येश्वर मंदिराला आणि गोशाळेचे काम सुरू होणार आहे त्याला भेट द्यावी," अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.