गेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेले बंड काल एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर येऊन थांबलेले असताना आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केली आहे. याबाबतचे पत्र व्हायरल झाले आहे.
तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे.
या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी सकाळीच शिंदे सरकार हे शिवसेनेचे नसल्याचे म्हटले होते. शिंदे सरकारवर कुठेही शिवसेना आणि पक्षप्रमुखांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख नाहीय, यामुळे हे शिवसेनेचे सरकार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव यांनी गुरुवारी, ३० जूनलाच ही कारवाई केली आहे.