काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांमध्ये २०१९ पासूनच महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून नाराजी होती अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. “आम्ही गद्दारी केली नाही. राज्यातील लोकांना शिवसेना भाजपचं सरकार यावं अशी इच्छा होती. परंतु त्यांच्या इच्छेविरुद्ध सरकार स्थापन झालं. त्यानंतर आमच्या आमदारांचाही विरोध होता. आम्ही आदेशानुसार काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करत पक्षाचा विस्तार केला. त्यांच्यानंतर आम्ही प्रमुखांचेही आदेश मानत होतो. परंतु ज्या प्रकारे अडीच वर्षात सरकार स्थापन झालं होतं, आमदारांच्या मनात आपण पुन्हा कसे निवडून येऊ, लोकांचं काम करू असे प्रश्न होते. दुर्देवानं आम्ही काही काम करू शकत नव्हतो. समस्या मुख्यमंत्री कोण होते ही नव्हती. आमचं सरकार असूनही कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता आणि आमदारही नाराजी व्यक्त करत होते. आम्ही अनेकदा प्रयत्नही केले होते. लोकांना आम्हाला नैसर्गिक युती हवी होती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“उद्धव ठाकरे हे मोदींना भेटले होते तेव्हाही पुन्हा युतीची चर्चा सुरू होती. परंतु पुढे काही होऊ शकलं नाही. त्यानंतर जे व्हायचं ते झालं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोक विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात. पण आम्ही सत्तेतच होतो. जी आमची विचारधारा होती, शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून दूर जाऊ लागले तेव्हा आम्ही हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
…तर का म्हणता मला पदावरून उतरवलं?“शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू असं ते म्हणाले होते. मला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हाही मुख्यमंत्री बनायचं नव्हतं. त्यांचंच म्हणणं होतं मला बनायचं नाही मग आता का म्हणतायत मला पदावरून उतरवलं? आम्ही कोणाला उतरवण्यासाठी किंवा खुर्चीवर बनवण्यासाठी हे पाऊल उचललं नाही. आम्ही राज्यासाठी आणि लोकांनी दिलेल्या कौलासाठी हा निर्णय घेतला,” असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबत जाणार का?उद्धव ठाकरे आणि आपल्या संबंधात आलेला कटुपणा कधी दूर होईल की नाही माहित नाही. परंतु भाजप आणि आमच्या शिवसेनेला जनतेचं समर्थन मिळालंय हे नक्की. सध्या आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढे जात आहोत. परंतु भविष्यात त्या लोकांना (उद्धव ठाकरे गट) विचार करायचाय की ते काय करतायत किंवा करतील असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.