मुंबई - राज्यात विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेचे १८ आमदार उपस्थित होते. मात्र राज्यात घडणाऱ्या घडामोडीवर शरद पवारांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.
विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. वर्षा बंगल्यावर दुपारी १२ वाजता ही बैठक होणार होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. परंतु या बैठकीत केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित असल्याने शिवसेनेला किती मोठा फटका बसला आहे याचा अंदाज येऊ शकतो. परंतु काही आमदार ऑन दे वे असल्याचं पक्षातील नेत्यांनी दावा केला.
बैठकीला कोण कोण उपस्थित होते?वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रवींद्र वायकर, मंगेश कुडाळकर, राहुल पाटील, उदय सामंत, प्रकाश फातर्पेकर, दिलीप लांडे, गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय पोतनीस, संतोष बांगर, सुनील प्रभू, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सदा सरवणकर या आमदारांनी हजेरी लावली.
बैठकीत काय घडलं? या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. सरकारला धोका नाही - शरद पवारदिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं की नाही हे माहिती नाही. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे तेच यावर भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे जे भूमिका घेतील त्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग झाल्यानंतरही सरकार चालतं हा माझा ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे असं त्यांनी सांगितले आहे.