मुंबई-
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कोसळली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदार आता उघडपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करू लागले आहेत. एकनाथ शिंदेंचे अत्यंत जवळचे समर्थक असलेले आणि पक्षाचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी घणाघाती टीका केली आहे. "बाळासाहेबांची मातोश्री आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री यात खूप फरक आहे. बाळासाहेबांची मातोश्री तीन माळ्यांची होती. पण उद्धव ठाकरेंची मातोश्री आठ माळ्यांची झाली आहे. आठ मजले आम्ही चढूच शकत नाही", असा टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सध्याची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही हे सांगताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या कारवाया फक्त आणि फक्त संजय राऊत यांच्यामार्फतच केल्या जात आहेत, असा आरोप गोगावले यांनी केला.
"संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्यापासून दूरावली. राऊत काय बोलताहेत आणि त्याचे काय परिणाम होतील हे सर्वांनाच माहित आहे. फक्त संजय राठोड नव्हे, तर आम्ही सर्व ४० आमदार हेच सांगत होतो. तरीही काही फरक पडला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी बराच अवधी देखील दिला. पण शिवसेनेकडून एकेकाचं पद काढून घेण्यात आलं. राऊतांचं वक्तव्य काळीज दुखावणारं होतं", असं आमदार भरत गोगावले म्हणाले.
उद्धव ठाकरेंची आता ८ माळ्यांची!"मातोश्रीचे दरवाजे उघडले तर जाऊ असं संजय राठोड म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तो निर्णय घेऊ. पण मातोश्री हे ठिकाण बाळासाहेबांचं आहे. त्यांनीच ते उभं केलं आहे. उद्धव साहेबांनी नवीन मातोश्री उभी केली. बाळासाहेबांची मातोश्री तीन माळ्यांची होती. उद्धव साहेबांची ही मातोश्री ८ माळ्यांची आहे. आम्ही चढू शकत नाही. आम्ही तीनच माळे चढू शकतो", अशा शब्दांत भरत गोगावले यांनी टीका केली.