Eknath Shinde Net Worth: महाराष्ट्रात निवडणुकीचे (Maharashtra Election 2024) बिगुल वाजले असून, येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सर्व पक्षांतील उमेदवारांनी आपापले अर्ज भरुन घेतले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी(दि.28) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांच्या मालमत्तेचा तपशीलही (Eknath Shinde Net Worth) दिला, त्यानुसार गेल्या पाच वर्षांत एकनाथ शिंदे यांची संपत्ती तिपटीने वाढली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंकडे 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वडील आणि पत्नीसह संपूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. नामांकनासोबतच सीएम शिंदे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती (एकनाथ शिंदे नेट वर्थ) 37,68,58,150 रुपये आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती तीन पटीने वाढली आहे. शिंदेंनी 2019 मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा त्यांनी 11,56,72,466 रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
शिंदे आणि पत्नीकडे एवढे सोने..!
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 1,44,57,155 रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 7,77,20,995 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. या दोघांकडे एकूण 9,21,78,150 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 26 हजार रुपये रोख आहेत, तर पत्नीकडे 2 लाख रुपये रोख आहेत. याशिवाय शिंदेंकडे 7,92,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे 41,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
एकनाथ शिंदेंवर किती रुपयांचे कर्ज?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती तर आहेच, पण त्यांच्यावर प्रचंड कर्जही आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीसोबतच कर्जाची माहितीदेखील दिली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपये कर्ज आहे, तर त्यांची पत्नी लता शिंदे यांच्यावर 9,99,65,988 रुपयांचे कर्ज आहे.
कोट्यवधींचे घर अन् जमीनआता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल बोलूया. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 13,38,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यात घर आणि जमिनीचा समावेश आहे. तर, त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या नावावर 15,08,30,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.